Wednesday, 25 January 2012

Matadan Jagruti Din..!!

मतदान जागृती दिन 

               आज मतदार जागृती दिन आहे. याच वेळी देशामध्ये चार राज्यातील व महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका व  जिल्हा परिषदा यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या दृष्टीने मतदारांची जागृती अत्यंत महत्वाची आहे. यासाठी आपण मतदान करण्याचे हे अपिल आहे.

               जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही सक्षमपणे राबविणारा देश म्हणून भारताकडे पहिले जाते. विविधतेने नटलेल्या या खंडप्राय देशामध्ये भौगोलिक समानता नसताना सुद्धा यशस्वीपणे लोकशाही राबविली जाते. याचे कौतुक सर्व थरातून होते. पण आपण जर आतापर्यंत झालेल्या सार्वजनिक निवडणुकींचा अभ्यास केला तर मतदानाची टक्केवारी हि ५०% च्या आसपास असते. त्याच बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे प्रमाण वाढलेले दिसते. लोकसभा व विधानसभा या निवडणुकीमध्ये हे प्रमाण ५०% च्या जवळपास असते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा पुणे जिल्ह्यातील मतदारांच्या केलेल्या अभ्यासातून आपला उमेदवार हा किती टक्क्याचा आहे असा विचार केला तर जास्तीत जास्त १७-१८% मते मिळालेला लोक प्रतिनिधी हा आपला आमदार असतो. याचाच अर्थ ७५-८०% पेक्षा जास्त लोकांचे तो खरे प्रतिनिधित्व करत नाही असे दिसते. परंतु उमेदवार बहुसंख्य असल्याने जी विभागणी मतांची होते त्याचे चित्र सुद्धा खूप काही चांगले असते असे नाही. आपण सर्वजण विकासाची व सुविधांची चर्चा करताना कायम लोक प्रतिनिधीना दोष देत असतो. त्यांच्याकडे एक बोट दाखवित असताना चार  बोटे आपल्याकडे असतात याचा विचार करत नाही. आपण आपले मतदानाचे कर्तव्य न बजावता सूचना करणे, टीका करणे, दोष दाखविणे यात धन्यता मानतो.

             जर खऱ्या अर्थाने लोकशाही राबविण्याची असेल तर प्रत्येक नागरिकाने स्वतःहून निर्भयपणे मतदान केले पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी पडले नाही पाहिजे. निवडणुकीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी दिली जाते. तरी सुद्धा मतदानाकडे पाठ फिरविण्याची वृत्ती आपण बदलली पाहिजे. जर लोकशाही सुदृढ व सक्षम करावयाची  असेल तर मतदान सक्तीचे करणे हा कायदा गरजेचा असला तरी तो प्रत्यक्ष येईल तेव्हा येईल. परंतु किमान आज "मतदान जागृती दिन" आहे याचा विचार करून आगामी निवडणुकीमध्ये आम्ही आमचे मत नोंद्वूच असा निर्धार आपण सर्वांनी करायला हवा.

               आपले "एक मत" लोकशाहीला गरजेचे आहे. यामुळे चांगले प्रतिनिधी निवडून येवू शकतात. तुम्हाला विकास हवा आहे तर मत द्या. मत विकू नका. विचार बदला. मानसिकता बदला. सकारात्मक विचार करा. माझ्या एका मताचे काय महत्व असे म्हणू नका. कारण एका मताने सुद्धा निवडून आलेली व्यक्ती लोकप्रतिनिधी होते असा इतिहास आहे.

              यामुळे जागे व्हा. दुसऱ्यांना सांगा व स्वतःही मतदानाचा  हक्क बजावा.

 मतदार राजा खऱ्या अर्थाने जागा हो ! जय हो !!
              

No comments:

Post a Comment