विचार करा ...
मला एक गोष्ट आठवते. माझा मुलगा शैलेश याचा पहिला वाढदिवस मोठ्या स्वरुपात साजरा करायचा हे आम्ही ठरवले. विश्रांतवाडीत राहायला येऊन पाचसहाच महिने झाले होते. यासाठी नातेवाईक, मित्रमंडळीना घरी बोलवावे, एक जेवण द्यावे ही इच्छा होती. पत्रिका छापल्या. त्या वाटल्या. सर्व तयारी केली. शैलेशची जन्मतारीख २१ सप्टेंबर १९९० आहे. पहिला वाढदिवस २१ सप्टेंबर १९९१.
सर्व तयारी झाली. काही खरेदी सुरु झाली. लहान मुल असले तरी आईवडिलांना हौस खूपच असते. तशी आम्हाला होतीच. आम्ही त्याला चांगला ड्रेस घ्यावा म्हणून खरेदीला पुण्यात गेलो. खरेदीला गेलो त्याच दिवशी बाजीराव रस्त्यावर प्रभात सिनेमाजवळ एका नवीन दुकानाचे उद्घाटन झाले होते. आम्ही म्हंटल चांगली संधी आहे. चला आज येथेच खरेदी करू. एका वर्षाच्या मुलाचे कपडे आम्ही पाहात होती. त्यांच्या किंमती ऐकत होते. मन काही ते खरेदीला तयार होत नव्हते. पहिलाच वाढदिवस खर विचार करायला नको होता. पैशाचा प्रश्न नव्हता. पण मी आणि पत्नीने विचार केला एवढे १०००-१२०० रु चे कपडे घ्यायचे तो किती दिवस घालणार. कारण मुले वाढत असतात. वाढत्या वयाबरोबर कपडे अपरे होतात. महागाचे कपडे घेऊन वाया जातात. बर ते कपडे जवळच्या नातेवाईकांना दिले तर राग येतो. यामुळे आम्ही दोघांनी शैलेश सह दुकानातून काढता पाय घेतला. सरळ आळंदीला गेलो. तेथे कपडे पाहिले. पुण्यापेक्षा कितीतरी स्वस्त व सुंदर होते. नक्की आठवत नाही पण ३००-३५० रु चा ड्रेस घेतला. ठरवून टाकले मुले मोठे होई पर्यंत पुण्याला त्यांच्यासाठी खरेदीला जायचे नाही.
आम्ही १०-१५ वर्ष हे तत्व पाळले. आजही मला लहान मुलांसाठी वारेमाप खर्च करणारे पालक पाहिले की आश्चर्य वाटते. मुलांचा हट्ट आपली हौस जरी खरे असले तरी वास्तव आणि गरज आपण पाहिली पाहिजे. आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे कपडे ८-१० वर्षे आळंदीत व नंतर विश्रांतवाडीत खरेदी करीत गेलो. मुलांचा आनंद काही कमी होत नाही. चांगले कपडे पुण्यापेक्षा जवळ आपल्या परिसरात मिळतात. आपण ते घेत नाही. गोष्ट छोटीच आहे, पण आशय मोठा आहे. आम्ही पती पत्नींनी अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये अंगीकारल्या आहेत. आपणही विचार करा.
(ज्ञानेश्वर मोळक)
No comments:
Post a Comment