Wednesday, 9 November 2011

Badal Swikara...

बदल स्वीकारा .... 

         माझ्या लग्नाची गोष्ट खूपच वेगळी आहे. ती सांगणार नाही. शैलजा मोळक यांनी संपादित केलेल्या  'शिवस्पर्श' दिवाळी अंकात ती दिलेली आहे.
         माझे विचार कसे होते व बदलत कसे गेले, हे महत्वाचे आहे. तसा मी लहान असल्यापासून समाजाचा विचार करणारा आहे. शालेय जीवनात समाजसेवेचे खूळ डोक्यात घेवून संपूर्ण शाळेची सफाई करणारा मी विद्यार्थी होतो. इयत्ता तिसरी व चौथी मध्ये महात्मा गांधींसारखा हातात खराटा घेवून तोंडाला कापड बांधून चोविसावाडीतील 'जीवन शिक्षण विद्यामंदिर' या शाळेत समाजसेवेची नकळत सुरवात झाली. मी लहान असलो तरी मोठे विचार स्वीकारत होतो. मोठे स्वप्न पाहत होतो. राहायला घर नसले तरी देशबांधणीचे काम करावे  अशी मनिषा होती.
        मी असा होतो तरीसुद्धा पत्नी नोकरी करणारी नको. ती घर सांभाळणारी हवी. मी आईलाच देव मानतो. मी मातृप्रेमी आहे. यामुळे आईला काहीच काम करायला लागू नये. आपल्या बायकोने आईची व घराची सेवा करावी असा विचार होताच पण जुनाट विचार सुद्धा होता की बायकांनी नोकरी करू नये. त्याची गरज काय ? यामुळे मी शैलजा रंधवे आत्ताची शैलजा मोळक हिला कोर्टाची कायम असलेली  नोकरी सोडायला लावली. माझी अटच ती होती. जर माझ्याशी लग्न  करायचे असेल तर तुला नोकरी सोडावी लागेल. शैलाने नोकरी व मी. यात माझी निवड केली. सरकारी नोकरीला रामराम केला. आमचे लग्न झाले. ती वाडीत माझ्याबरोबर  राहू लागली. पण जसेजसे दिवस जाऊ लागले. तिचे डोक्यावरचे पाणी आणि डोळ्यातील अश्रू  याने माझी कालवाकालव  झाली. घरच्यांना तिची किंमत कळलीच नाही. तिची नोकरी सोडून काहीच उपयोग झाला नव्हता. परिस्थिती बिकट आली होती. यामुळे तिला सपोर्ट करावा असे वाटले.यामुळे तिचे LLB चे अर्धवट शिक्षण तिने पूर्ण केले. खूप कष्ट व जिद्दीने ती वकील झाली. तिच्या मुळे माझ्या विचारात  बदल झाला. स्त्रियांकडे पहायचा दृष्टीकोन बदलला.
        माझी चूक माझा लक्षात आली. एकदा विचार पटला की त्वरित अंबलबजावणी मी करतो. यामुळे तिला सामाजिक असलेली आवड वाढावी म्हणून आम्ही 'जिजाऊ ग्रंथालय ' सुरु केले. आता तर ती खूपच सक्षम झाली  आहे. माझ्यापेक्षा जास्त Practical आहे. तिला सामाजिक प्रश्नांची जाण आहे. तिने तिचे विश्व निर्माण केले आहे.
       मी बदल केला. विचार बदलला. 'स्त्री'चे महत्व संसारात जाणले. यामुळेच मोठे परिवर्तन आमच्यात झाले. म्हणून छोटा बदल केला तर मोठा लाभ होतो. बदल हे जीवनातील महत्वाचे अंग आहे. 

                                                                                                                         (ज्ञानेश्वर मोळक)

1 comment:

  1. Very much eye opening story for others to follow...........

    ReplyDelete